आंदेगाव ते रोषणगांव

 आंदेगाव ते रोषणगांवचा प्रवास...


जय हिंद दादा,जय हिंद दादा…बालपणीचा सर्वात आवडीचा शब्द…गावांतील लहान पोरा सुरा पासुन ते म्हतारे कोतारे मग ते पुरूष असो की महिला …सर्वांच्या ओठांवरील हा शब्द …देशभक्तीच्या ,सर्व धर्म समभाव च्या संस्कारांची गावशाळा भरविणारे 

दादा आमच्या गावचे सर्वेसर्वा… गावात तर वचक होतीच पण आसपासच्या परिसरातील लोकपण रोषणगांवकर पाटील म्हणुन झुकुन जय हिंद म्हणायचे…आणि ते तेवढ्याच रूबाबदार पणे जय हिंद…उत्तर द्यायचे…

रोषणगावात जाधव मराठा पाटलांचा जेमतेम एकच वाडा…गावांत जायचं  तर सुरूवातीला बजरंग बली चे दर्शन घेऊनच गाव प्रवेश व्हायचा…उजव्या बाजूला जाधव पाटलांचा भला मोठा पांढऱ्या मातीच्या बुरूजावर बांधलेला वाडा…प्रवेश द्वार पण खुप भारी…लहान पणी आम्हाला या वाड्यात जाण्याचा जेव्हा केव्हा योग आला असं वाटायचं की आज गडावर जात आहे…ह्या वाड्याचे मूळ मालक स्वर्गीय आनंदराव जाधव पाटील व त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गीय अनुसयाबाई आनंदराव जाधव पाटील (यांना संमदा गावं आजीमाय म्हणून ओळखायचा)..…हे…ज्यांना समंदा गावं दादा म्हणुन ओळखतात ते म्हणजे मालकांचे मोठे चिरंजीव श्री नागोराव जाधव पाटील…छोटे सरकार श्री शंकरराव जाधव पाटील…दोघा भावंडांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे एक जातीवंत राजकारणी ,समाजकारणी तर दुसरे हाडाचे शिक्षक…

दोघा भावंडांनी आपल्या नावासमोर आडनाव लावण्याऐवजी गावांचे नाव लावण्याची आगळ्यावेगळ्या परम्परेची सुरूवात केली…नागोराव पाटील रोषणगांवकर…शंकरराव गुरूजी रोषणगांवकर…

मी जेव्हा केव्हा माझ्या आजोळी (शेळगांव छत्री) जात असे त्यावेळी माझे मेहुणे मला चिडवल्यागत म्हणायचे…

कधी आला रे आंदेगाया…कधी आलं रे हे आंधेगावच…

मला मात्र मोठा प्रश्न पडायचा म्हव नाव तर गोविंद…हे पोटे तर धड नाव पण घेईनात…एकच बरं हाईस का आंदेगाया…मन उपदेसुन जायचं पण करणार काय…इलाज नव्हता…

माझी ओळखच आंदेगाया अशीच पडली होती…मी बाबांना विचारलं बाबा हे आंदेगाया का म्हणतात ह

आपल्याला…त्यावर बाबा म्हणाले अरे लेकरा आपल्या गावच जुन्न नाव आंधेगाव…म्हणून हे सर्व आपल्याला आंदेगाया म्हणतात रे…

मला पडलेला आणखी एक नवीनच प्रश्न होता… फाट्याला लावलेल्या बोर्डावर तर रोषणगांव  लिहलेल आहे मग… आंधेगाव का म्हणून…

बाबा पण न शिकलेले ते म्हणाले याच उत्तर दादांना माहीत आहे…बराच कालावधी गेला तरी विचारण्याची हिंमत कधी झाली नाही…

दादांना समोरासमोर उभे राहून बोलण्याची भल्याभल्यांची हिम्मत नव्हती…एवढा दरारा होता…

शरीर यष्टीचा बलदंड ..रंग गव्हाळी…पांढराशुभ्र धोती व सदरा त्यांचा पेहराव …डोक्यावर गांधी टोपी…डोळ्यांवर चष्मा..हातात ऐटदार दंड्या…त्यांच्या नसानसात रक्ताच्या थेंबा थेंबात कॉग्रेस भिनभिनलेली…

वेगवेगळ्या प्रश्नांची जाण असलेला व प्रश्न मार्गी लावण्याची तळमळ असलेला एक लढवय्या…दादा…ते आज हयात आहेत त्यांवरती लिहल तेवढे कमीच …क्रमा क्रमाने लिहत होणार आहे…

बराच काळ गेला आण मी पण शिकलो सवरलो…शिक्षणाने हिम्मत आली आणं दादा ना जय हिंद म्हणत पुढे आलो …व त्यांना म्हणालो दादा बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट विचारावी म्हणतोय पण …धाडस होत नाही…विचारू का?

भारदस्त आवाजात …विचारणारी माणसं मला आवडतात यात काय भीण्यासारख…आर चुकीच्या कामाला भ्यायच…असतं 

मला जरा बरं वाटलं…आणं विचारायला लागलो …दादा आपल्या गावला आंधेगाव का म्हणत्यात…तसं गावच नाव तर रोषणगांव हाय ना …

त्यावर ते बोलुन लागले…आपल्या गावच जुन्न नाव आंधेगाव … कसं नाव पडलं ते काहीच थांग पत्ता नाही पडलं ते पडल…आम्हाला पण आजुबाजुचे लोक आंधेगावकर म्हणून च बोलत होती…मला पण लयी वाईट वाटायचे पण करणार काय…पण मजेशीर किस्सा सांगितला…बिलोली तहसील ला एक मुस्लिम तहसीलदार आलेला होता तो गावदौरे करीत आंधेगाव ला पण आला …तहसीलदार व दादांची वेगवेगळ्या विषयांवरची  रंगतदार चर्चा चालु होती…मध्येच तहसीलदार म्हणाला…

“क्या पटेल ये गांव का नाम कैसा है जी आंधेगाव…अच्छा लगता है क्या…बदल दो ना …

लोगां आंधेगाव के अंधे लोगां कते है…नामा बदलकर रोषणाई कर दो ना…

दादांच्या मनातील मर्मावर कुणी तरी का होईना बोट ठेवलं होतं…

त्या बाबींवर दादांनी विचार करून गांवाच्या नावाचा काया पालट करून टाकला…आंधेगाव चे नवीन रोषणगांव असे नामकरण झाले…खरं तर नुसतं नावाने कूणी ही रोषण होत नसत तर कर्मानी रोषणाई पसरतं असते…दादांनी आयुष्यभर कॉग्रेसी विचारधारेशी नाळ जोडुन काम केलं आज ही करीत आहेत .त्यांनी अनेक पदे भुषवुण जसे जिल्हा भूविकास बैंक,नांदेडचे अध्यक्ष,संचालक म्हणून काम पाहिलेल आहे.एस.टी महामंडळ इंटक चे सचिव, नांदेड जिल्हा परिषदेचे सहयोगी सदस्य,विशेष तालुका दंडाधिकारी,अनेक सहकार्य साखर कारखाण्याचे संस्थापक संचालक म्हणुन त्यांनी जे कार्य केलेल आहे . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.विलासरावजी देशमुख साहेबांच्या सोबत २५ दिवस त्यांनी अमेरिका,जापान, इंग्लंड, इंडोनेशिया,फ्रांस अशा नामांकित देशांचे दौरे केले हे सर्व अत्यंत भूषणावह आहे.आंधेगाव चे नाव आपल्या कर्माने उजळवुन टाकणाऱ्या दादांमुळे  खऱ्या अर्थाने आंधेगावचे रोषणगांव हे नाव झाले…मी जेव्हा प्राध्यापक झालो त्यावेळी त्यांनी काढलेले उदगार कायम स्मरणात आहेत...नाव काढलं रे बापाचं भाऊ..तुमच्या सारखी लेकरं असणं नशीबाची गोष्ट लागते...आज नवीन पिढीतील लेकरं जेव्हा यशस्वी होतात त्यावेळी ते आवर्जून “ गावचे नाव केलात पोरांनो नाव केलात…” रोषणगांवच्या रोषणाई मधला पहिला मानाचा तुरा रोवणारा अवलिया  व अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे दादा…

श्री गोविंदराव जाधवांच्या शब्दात…

असावी चांगल्या कार्याची रोषणाई.... ज्याने अंधार ही पळून जाई !!

हीच प्रचीती आली आंदेगांव चे रोषणगांव झाले !!


शब्दांकन

डॉ गोविंद गुंडप्पा शिवशेट्टे रोषणगांवकर

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

Comments