आठवणीतले बाबा
दोन पोते ज्वारीची उतराई
(सत्य घटनेवर आधारीत)
बाबांच वय जस-जस वाढत चाललं होतं तसं-तसं बा च्या आयुष्यात व परिवारीक जीवनात सुख समृध्दी येत होती.सुखाच्या सागरात न्हाऊन निघालेला बा दुष्काळाच्या झळा कधीच विसरला नाय.घटना आहे ती जवळपास 1972 ची.हा काळ नसुन मुक्या जीवांचा,मानवी वस्त्यांचा कर्दनकाळ होता म्हणुनच त्यास दुष्काळ म्हटलं गेलं.घरात अठरा विश्व दारिद्रय. कधी भाकरीचा चंद्र नाही मिळाला..मिळाला तो चंद्र कोर वा कधी जास्तीच नशिब फळाळल तर चंद्राचा अर्धा कोर.
बाबा घरी दारी कमी राणावनात जास्ती असे.रान वन सुद्धा दुष्काळाने ओसाड झाली होती.बाबाला एकच चिंता परिवाराच्या भाकरीची,आलेला दिस कसा जाईल.येणारा प्रत्येक दिवस कठिणच उजाडत होता.थकलेला बाबा जेव्हा घरात आला,पायावर पानी टाकलं,पहातो चुल विना पेटलेली.लेकरानी टाहो फोडला. बाबा भुक लागली.विचारांन थैमान घातलं होतं..काय करावं काय नाही काही सुचेना.मुंडकं गुडघ्यात घालुन बसण्याची ही वेळ नव्हती.विचार केला जाऊ पिंपळगावच्या पोलिस पाटलांकड मागुन पाहु मिळेल का ज्वारी.पंचक्रोशितील लोक आता पण म्हणतात पाटलांच्या दारी जाणारा इसम कधीच रिकाम्या हाताने परत आला नाही.बाबाला बळ आलं आपण तर पाटलांच्या नात्यातले , इतरांच्या तुलनेत आपलं जरा जास्तीच हक्काच घर …होय नाही का..तरी भीती मनात कायम होतीच . पाटलांनी बाबांना पाहताच बोलले…भावजी कसं काय..काही अडचण हाय काय.भीतीच वातावरण ओसरत होत..भावजी यावर्षी जरा जास्तीच दुष्काळ हाय घरी ज्वारी,बाजरीचा दाणा पण नाय,म्हणुन आलो होतो.अन्नाविना व्याकुळ झालेला चेहराच खुप काही सांगुन जात होता.पाटलांन ते ओळखलं व बोलले.अगोदर जेवून करुन घ्या आणि जाता जाता ती दोन पोती ज्वारी घेऊन जा...जीवात जीव आला.दोन पोती ज्वारी केवळ ज्वारी नव्हती ती लेकरांचा घास होती...पुढचं भविष्य टिकवुन ठेवणारी शिदोरी होती.नाही-नाही म्हणत पोटभर जेवुन बाबा ज्वारीचं पोत घेऊन निघाला.दोन ते तीन मैलाचे अंतर एवढं ओझं घेऊन बाबा लगबगीनं चालत होता.अनवाणी चालुन-चालुन बाबा दमला होता,घामानं कासावीस झालेला जीव
गोदावरी नदीच्या पात्रात आल्यावर डोईवरच ओझं खाली उतरवून वाळुंत चलमा काढुन थोडा वेळ धीर धरला तोवर वाळुतल पानी स्वच्छ झालं होत…ओंझळेन गटागटा गार-गार पोटभर पानी पिऊन..बाबा घराकडे निघाले.डोक्यावरची ज्वारी कधी घरी जाईल आणि कधी जात्याच्या दोन्ही पाटातुन पीठरुपान कधी बाहेर ईल…हेच विचार मनात रवंथ करीत होते…धापा टाकत बा घरी पोहचला आणं माझ्या आजीन म्हणजे बाच्या माईने चटकन उतरुन घेतलं.लेकांला डोळे भरुन पाहत पुटपुटली बाबा लयी चांगलं झालं बघ पाटलच वंशवेल वेशीला जाईल बघ…आमच्या पोरा बाळाचा लयी-लयी अर्शिवाद लागलं बघ..पोरा बाळांच्या तोंडांत पडलेला घास पाहुन बाबा आनंदान विभोर झाला होता…दिसा मागुन दिवस जात होते गोदामाईला 1983 खुप मोठा महापुर आला होता. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी.गावच्या चोहुबाजुने वाटा बंद झालेल्या स्थितितुन पुर हळु हळु ओसरु लागलं…आलेल्या पुरामुळे हाती आलेल पीक राळ रांगोळी झालं होतं.पण गोदामायनं जेवढं नुकसान केलं त्यापेक्षा तिनं रान मातीच भर केलं होतं.दुबार पेर्यांनतर इतकं इतकं पिकलं की घरात दारात धान्य मावेना…
माझा जन्म पण महापुरातलाच आईला कित्येकदा विचारल नक्की माझा जन्म कधी झाला ..तेव्हा आडाण्याला आईला तेवढंच आठवत होतं…आर तुवा जन्म हनुमान जयंती पुढं होती आण नदीला लयी पुर आला व्हता बघ…पुंहा कधी विचारलं की हेच ते उत्तर मिळत असे…मग यांनतर कधीच विचारलं नाही…
1993 ला पण नदीला भरपुर पुर आलं. डोळ्या देखत शेतातील सोनं व्हाऊन गेलं..मी तेव्हा सातवीत होतो…माझे मोठे भाऊ बालासाहेब बाबा सोबत शेतात मदत करीत होते.पुरानंतर शेत जमीनीला नांगरटी करुन मोगड्याने फणुन घेतलं…रब्बी ची बडी ज्वारी पेरली. बाबाला आशा होती की यावर्षी खुप सारे पिकल…बाबाना माहित होत पुरांन जमीन अधिक पिकते. तसंच झालं…शेतात खंडीभर ज्वारी झाली…बाबा त्या दिवशी खुपचं आनंदी होते .बैल गाडी लावुन तीन खेपा केल्यावर खंडीभर ज्वारीचा ढिग घरात पडला होता.
बाबांच्या मनात सतत एक विचार सलत होता.आणं माझे मोठे भाऊ बालासाहेब यांना जवळ बोलावले व म्हणाले बाबा इकडे ये जरा…माझ्या मनात एक गोष्ट मला खुपचं बोचते आहे.सांगा ना बाबा काय आहे…तेव्हा त्यांनी मोकळे पणाने बोलुन दाखवले आरे बालु मी दुष्काळात पोलिस पाटलां कडुन दोन पोते ज्वारी आणली ह़ोती पण अद्याप ती त्यांना परत करु शकलो नाही. यावर्षी तर आपल्याकडे खुप ज्वारी झाली पाटलांची आणलेली ज्वारी परत करुत का रे ? भावांनी लगेचच हो भरली…मग काय मनात आणखी एक बाब डोकं वर काढुन सतावत होती…पाटलांना नेमक किती ज्वारी द्यावी? दोन पोते द्यावी तर काय म्हणतील…दोन त्यांचे व दोन आपले मिळुन चार द्यावेत का ….मनात अनेक प्रश्न होते .जे होईल ते होईल पण ज्वारी देऊच…निर्धार केला .चार पोते भरले दोन बैलगाडी वरती चढवले त्यावर कडब्याच्या पैंड्या टाकल्या त्यावर पुन्हा दोन पोते टाकुन बैल गाडी निघाली.दिग्रस येथे नदीवर 1983 च्या महापुरानंतर पुल बांधला होता. बैलगाडी त्याच मार्गे पिंपळगाव येथे पाटलांच्या वाड्या समोर थांबविली.पाटलांचे घर कुठे होतं…भारदस्त वाडा ,बुरुजांच उंच किल्लेदार चिरेबंदी वाडा.बाबा पाटलांच्या बैठकीत पोहचले. पुढे पाटील बाबांना पाहताच म्हणाले काय कारभारी(बाबा जेव्हा पिंपळगाव ला सालगडी म्हणुन होते तेव्हा सर्वजण त्यांना कारभारी म्हणुनच बोलायचे) कसं काय येण झालं,सर्व ठिक आहे ना ?काही अडचण तर नाही ना ? बोला तरी असे गप्प का ?...बाबांचीच काय पाटलांच्या पुढं भले भले अबोलो होत…बा घाबरत घाबरत म्हणाले भावजी काही नाही असंच आलो होतो. काहीच नाही हो…बस या वर्षी माझ्या शेतात खंडीभर ज्वारी झाली बघा…हजार कडब्याच्या पेंड्याची वळई पडली बघा…ऐकुन पाटील म्हणाले छान झालं ना करीत रहा असंच कष्ट…बाबाने शेवटी हळुवार आवाजात म्हणाले भावजी मागे नेलेली ज्वारी परत करावं म्हणुन आलो होतो बघा. शांत पुणे ऐकुण घेणार्या पाटलांनी मधेल बोलणं थांबवुन…मी तुम्हाला ज्वारी उसनी किंवा उधार दिली होती का ? कडक स्वरुपातील बोल ऐकल्यावर निरवं शांतता पसरली. बोलण्याची हिंमत होत नव्हती.हे बघा आणलेली ज्वारी जशीच्या तशी परत घेऊन जा.बाबा मनातल्या मनात काही तरी बोलत होते.पाटील उतराई व्हावं वाटत होतं..पण आज मला कळलं …माईंच्या,रोटीच्या व मातीच्या ऋणातुन कधीच मुक्त होता येत नसत.बाबाने 17 मे 2022 ला शेवटचा श्वास घेतला पण शेवटच्या क्षणापर्यंत पिंपळगाव व पाटलांना कधीच विस्मरले नाही.

Comments
Post a Comment