तंबाखू चा धडा…


बान संपूर्ण आयुष्यच शेत,रानमाळ आणि जनावरांच्या गोतवळ्यात घालवलं…शेती व शेती साठी लागणारी जनावर बा चा जीव की प्राण होती.शेळगाव छत्री बा ची सासुरवाडी…जवळच नायगावचा लयी भारी आणं मोठा जनावरांचा दर गुरुवारी आठवडी बाजार भरायचा. फार देखनी,उंच धिप्पाड विविध रंगांची,बाण्याची जनावर यायची. अशा बैल बाजाराची आसपासच्या शेतकऱ्यांना ओढ असायची.तशी ओढ बा ना पण होती.तवा बा कडे बैल जोडी नव्हती असलेली गाय विकावी आणं नवीन एखादी आपल्याला झेपेल अशी बैल जोडी विकत घ्यावी ह्या बेतांन बा आणवाणी पायाने निघाले नायगावच्या बाजाराला. तवा कसली वाहन कसले रस्ते…चिखलाची पाऊल वाट काट्या कुट्याचा पांदनीचा रस्ता … तसं आंदेगांव ते नायगाव मदल्या मार्गे पंधरा ते वीस मैलाचे अंतर…रात्रीच बान माझ्या माई ला दोन चार रोट्या करून ठेवायला सांगितल्या होत्या. त्या धोतराच्या सुडक्यात लसणाच्या चटणीबरोबर गुंडाळून घेऊन बा भल्या पहाटे तीन वाजता दिग्रस ,अरळी कुंभार गाव सुजलेगांव, शेळगांव मार्गे तडक नायगावच्या बाजारासाठी निघाले… चालुन चालुन जीव दमला होता भूक पण लागली होती.सोबतीला आणलेल्या भाकरीच गाठोड सोडुन चटणी सोबत खाऊन घेतलं. जिथे ओढा,नाला तिथलं गटागटा ओंजळीने पानी पिऊन पुन्हा पायपीट करत पुढे बाबा आणि मागे गाय एकमेकांच्या संगतीने निघाले…दिस डोईवर सरकत होता तसं-तसं बाजार जवळ जवळ येत होतं. बाजारात गर्दीच-गर्दी …

 बा आसुसलेल्या नजरेने वाट पाहत होते की गाईला कोणी तरी गिऱ्हाईक येईल आणि गाय विकेल तर बैल जोडी घेऊ पण …पण ठरवल्या प्रमाणे घडलं नाही…गाईला घेण्यासाठी कोणतेच गिऱ्हाईक आले नाही…बा परतीच्या वाटेने पुन्हा निघाले …बाजाराला येताना बा ज्या आशे ने लवकर लवकर पाऊल टाकीत जोमाने आले होते त्याप्रमाणे परतीला बाची पाऊल जोमाने पडत नव्हती…गाईचं मात्र उलट होत बाजाराला जाताना गाईला ओढत आणवं लागलं होतं पण घराकडे जातांना मात्र गाय झपा झप चालत होती…गायीला घराची ओढ होती पण बा मात्र निराशेने पार थकला होता…

 बा वयाच्या पन्नाशीत होता…तसं बा ला एक व्यसन जडल होतं.. तंबाखू च …तसं पैक असायचं नाही पण कसं तरी तंबाखू जमलं तसं खाण्याची सवय लागली होती…रामपाऱ्या पासुन चालुन -चालुन दमलेल्या बाला तंबाखू ची आठवण झाली चुन्याची डबी होती पण तंबाखु मात्र नव्हत…पुढुन एक पाहुणं येताना दिसल…पाहुणं पांढऱ्या रंगाचे धोतर व कमीज घातलेल होत…बा न निरखून पारखुन पाहिलं की पाहुण्यांच्या खिश्यात तंबाखू ची पुडी दिसतया…जीवात जीव आला.पुढनं आलेल्या आन ओळखी पाहण्यास रामराम केला …कोणत्या गावच म्हणावं …तोंड ओळख झाली …मोठ्या तल्फीने पाहुण्यांनाकडे , चिमुटभर तंबाखाची मागणी केली…

पाहुण थोडंसं तंबाखू द्या बरं…

कसलं तंबाखू…आण कुठल …तंबाखु…पाहुण्यांने उत्तर दिलं…

बा तसा मनातल्या मनात पुटपुटला…तेच ओठांवरती आलं.

द्या की जरासं …लयी तलफ आलीय…

पाहुणं …नाही खरच नाही म्हणत होतं.. 

पांढऱ्या कपड्यातुन खरं काय आणं खोटं काय स्वच्छ पणे दिसत होतं…

गाईची ओढाताण गावाकड होती आणि बा चा सगळा जीव तंबाखू वरती जडला होता…

खिशात तंबाखू ची पुडी असताना देण्याची इच्छा नाही हे सगळं ठिक आहे पण …चुकलं तर आपलंच ना…मागायलाच नग होत…मागुन शेण खाल …नको तेवढा अपमान काय कमी झालं ,झालेला अपमान दूसऱ्याने नव्हे आपल्याला जडलेल्या व्यसनाने केलेला आहे…स्वतःस स्वतःचा आत्मा झिडकारत होता…झालं तेवढं अपमानाच महाभारत कमी झालं का? मग ठरवलं ज्या तंबाखू ने आपल्याला दुसऱ्या पुढं हात पसरायला लावलं त्यालाच आज आणि आतापासूनच विसरायचं …झटकन खिशात हात घातला चुण्याची डबी बाहेर काढली त्याच ठिकाणी एका पाषाण दगडासमोर डबी ठेवली…आता आयुष्यात पुन्हा कधीच तंबाखू नाही… बाबांना करुन चुकलं होतं की व्यसन माणसाला झुकायला लावत …लाचार व्हायला लावत….

ही घटना खुप काही जीवनाचा धडाच जुण शिकवुण गेली


शब्दांकन

डॉ.गोविंद गुंडप्पा शिवशेट्टे

रोषणगांवकर

Comments