एकुलती एक माणसं'


पावसाळा आला रे आला की मग काय ग्रामीण भागाला आरोग्याच्या अनंत अडचणीला सामोरे जाव लागत…पुर्वी पण,आता पण ,पूर्वीच्या आठवणी तर मनाच्या पिंजऱ्यात खोलवर घट बसलेल्या आहेत…दुधाण्यातल्या खरडण्या सारख …खरडुन-खरडुन काढत जावं व खात जावं…

नाव जरी रोषणगांव असलं तरी म्हया गावात पण पावसाळ्यात अनेकांचे अतोनात हाल होत असत.सगळ्यात मोठा प्रश्न होता तो पाण्याचा…ग्रामपंचायतीने निरखुन पारखुन माधराव पाटलांच्या उकंड्या शेजारी बोर पाडला व्हता…पानी बकळ लागलं होतं.तस हा उकंडा सादा सूदा नव्हता जमीनंदाराचा,गावच्या पाटलांचा…पण कुठे राहिल्यात आता पाटिलक्या…शिल्लक राहिला फक्त तो उकंडा…आज तो उकंडा वाण्याळीच्या घरा दारातील केर कचर्याची कचरा कुंडी होऊन बसलाय…

 बोर चालू झालं…पाण्याचा प्रश्न मिटला… पण संडास ,उलट्यांचा नवीनच प्रश्न पेटला…गावांत उलट्या संडासन अक्षरशः थैमान घातलं…पण करणार काय…या काळात उलट्या संडासनी बेजार झालेल्या प्रत्येक पेशंट चा एकमेव दैवत धर्माबाद चे डाक्टर सुत्रावे…हे डॉक्टर पण लयी सद्गुणी…आसपासच्या खेड्या पाड्यातल्या रुग्णांना एकच नाव माहित होतं .पोरं खेळता खेळता पडली आण हाथ,पायाची हाड मोडली की थेट सुत्रावे यांच्या दवाखान्यात येत असत,सर्दी,खोकला कसलाही आजार असु द्या, समद्या बिमार्यावर एकच रामबाण उपाय डॉ सुत्रावे… काही ही होऊ द्या.इंजेक्शन पक्कं होत.गरम पाण्याने भरलेलं पातेल त्यात ही इंजेक्शनची हत्यार पडलेली असायची. आला रुग्ण की इंजेक्शन हमखास होतच…कुणाच्या दंडेवर वा कुणाच्या  ढुंगणावर…जागा बदलेल पण इंजेक्शन नाही.आम्हा लहान पोरांना तर सुईच लयी भ्याव वाटायच .आजार आला तरी इंजेक्शनच्या भीतीने पोटात सळ व्हायायच.बाबांना म्हणायचो…कुठं काय झालंय मला…थोडीशी ताप हाय होईल नी बरी बा…पण ते ढुंगणावरच इंजेक्शन नकु ….खरच एक दोन दिसानंतर ताप पण उतरुन जायायची…जणु ताप पण त्या इंजेक्शनला घाबरायची…

डॉक्टर सुत्रावे हे नाव इतक पाठ झालेलं की विसरावे म्हटलं तरी विसरत नाही…पावसाळा आला की डायरिया,मलेरिया अशा बिमार्या डोकं वर काढायची…मला आठवत 1993 ची घटना असेल मी त्यावेळी पाचवी ला गावच्या शाळेत होतो.माझ्या माय ला पण उलट्या संडास नी घेरल होत..गावात तवा कुठं संडास रुमा होत्या …गावचे पांदण रस्ते, खार्या हीच उघड्यावरची संडासाची ठिकाण होती…हातातला तांब्या खाली ठेऊन देईना …आण खाली झालेला तांब्या भरु देईना…सतत एकच काहुर पोटात गडबड…तवा बैलगाडी वर घेऊन गिट्टी चिखलाचा अवघट रस्ता तुडवीत माय ला धर्माबादला डॉ सुत्रावे यांच्या दवाखान्यात आणलं …आठ ते दहा दिस माय आडमिट होती …फक्त एककावन सलाईन बाटली लावली गेली…असं एकदाच घडलं असं नाही तीन तीनदा …आज ही जेव्हा मी डॉक्टरांकडे जातो ते विचारतात …कसं काय हाय ,ठिक आहे ना आमुचा पेशंट…आज काल निलंग्यालाच आहे ना…काही अडचण असेल तर सांगत चला…मेव्या पेक्षा सेवेचा वसा घेतलेला   डॉक्टरीतला देव माणुस…

बाबा सोबत जेव्हा जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा ते सांगायचे…माझं वय जेव्हा पनासीत होत तेव्हा हे डॉक्टर नुकतेच आले होते . सुरूवातीला पायी येऊन गावों गाव रुग्णांची तपासणी करीत असत…बाबांना ते वैयक्तिक ओळखत होते…मायच्या आजाराच्या निमित्ताने सतत त्यांचं वा मायला घेऊन बाबांचं डॉक्टरांकडे जाण येण होतच असे …

 मी गावांकडे सहजच आलो होतो…आणं आल्या आल्या बाबाशी बोलणं झालं.दुसर्या दिवसांच्या सुर्यांच दर्शन होण्या अगोदरच बाबा जवळ येऊन दुसऱ्याला ऐकु येणार नाही अशा हळुवार आवाजात बोलत होते…जाऊ या का डॉक्टर ला भेटायला…

        झालं तरी काय तुम्हाला…तब्येत वगैरे तर ठिक हाय ना बा…

मला काय झालं धाड भरलीय …मी अगदी ठणठणीत हाय…

मग उगीच कशाला डॉक्टर कडे…

गावांतील लोक ….ठाण्याची व दवाखान्याची पायरी चढु लागु नये म्हणुन देवाकडे प्रार्थना करतात आण तुम्हाला लयी हाऊस लागलीय भेटायची…

तसं नाही रे…मला दोन तीन दिवसांपूर्वीच वार्ता कळालीय…की सुत्रावे साहेब बीमार हायता म्हणे…

काय बाबा आता कमाल झाली पहा…आता डॉक्टरांची तुम्ही तपासणी करणार हाय की काय…

नाही रे … बीमार माणसाला भेटलं , बोललं की त्याची अर्ध्याधिक परकृरती बरी व्हती या…

मला हिंदीतील ती महण खरोखर वाटली…बीमार को दवा के साथ साथ दुवाओं की भी जरुरत होती है…

मग काय,ना म्हणण्याचा प्रश्नच नव्हता…अंगावर पटकन पानी टाकलं…आण निघालो भेटायला डाक्टरांना…धर्माबादला

 रोषणगांव पासुन नऊ,दहा मैलवर धर्माबाद तालुक्याचं ठिकाण…मोंढा पार करुन जिजामाता कन्या शाळेच्या अगदी समोरच डॉक्टरांचा ठिकाणा…माझ्या मनात एक ऐगळीच उत्सुकता होती…वेळ दितील डॉक्टर…लाईन लांबच लांब लागली व्हती.एका नंतर एकाला तपासायला पाठवित व्हते…मी पुढं जाऊन इचार पुस करण्यासाठी जात वह्तो.मागच्या पेशंट नी आवाज दिला

…कुठं निघालो पुढं…दिसत भी न्हाय की  काय…ही सगळी रांग काय गुरा ढोरांची हाय व्हय…

तसं न्हाय…

मग कसं हाय सांगा तरी…

फकस्ती साहेबांना भेटायची हाय…

आम्ही पण साहेबांनला भेटण्यासाठी च सकाळपासून थाबंलेलो हाय…माकड हाड …करकचुन दुखतया…

एकाचा सुर थांबला न थाबंला…दुसऱ्याने तोंडाचे झाकण उघडुन…बोलला…

साहेब दोन तीन दिस झालं चकरा मारुन मारुन माझा तर जीव मेटाकुटीला आलाय….हो त्यात तुम्ही आता येऊन लगबीगीने कुठं चालावं…

पेशंटची आरडाओरडा ऐकुण…कंपाऊंडर बाहेर येऊन…काय गडबड हाय…

हे बघा … मध्येच येऊन…हे 

माझे स्वच्छ कपडे ,टापटीप पणा पाहुन कंपाऊंडर बोलला…साहेब इथं तपासणीसाठी नवम्बर लावावा लागतया…तुम्ही तीन वाजेच्या नंतर या…

मी बोलायला लागलो…आहो डॉक्टरसाहेबांना सांगा रोषणंगावचे गुंडप्पा पाटील आलेत भेटायला…

आजच्या सारखा पंचतारांकित एसी बीसी,काचकोरानी सजलेला दवाखाना नव्हता..आमचं म्हणणं सहजच साहेबांना ऐकु गेलं…त्यांनी लगेचच बा व मला मध्ये बोलावलं…

नमस्कार…चमत्कार झाला…

कंपाऊडरला सांगितल…जरा थांबव ….पेशंटना…

कसं काय काही अडचण…येण कसं काय झालं…टेका तिथं 

बा न काठी बाजुला ठेवली…बोलले…काय तुमचीच तबीयत खराब झालीया म्हण…काही नाही…गुडघ्याच्या वाट्यांची आरडाओरड चालु हाय…बीपी ,शुगर…वर खाली तराजुच्या काट्या परमान …हालत राहतो सदानिदा…शरीर बिमार्याच खुराड झालं…त्यात काही व्यसनं …पण

जरा आराम तर करावं मग…हे तर रोजचं हाय

….आयकुन साहेबांच्या चेहर्यावर समाधानांचे भाव अलगद पणे दिसत होते…आपल्या दुःखाचं गाठुड घेऊन लोक येत्यात…आलेल्या पेशंटला विचारतो…काय दुखतंय…सर्दी हाय,खोकला पण…पाठीची हाडपण लयी दुखतंय…त्यांच्या दुखावरच औषध पानी देऊन देऊन थकलो…आम्ही पण माणसंच ना… पण कुण विचारतया आम्हाला… असतात एकुलती एक माणसं तुमच्या सारखी…

बा ऐकत व्हता…

आडानी बापातील माणुस पणाच जगणं…आण डॉक्टरांचा बा वरतीचा आपलेपणा… शब्दा पलीकडेच आहे…


    

शब्दांकन

डॉ.गोविंद गुंडप्पा शिवशेट्टे

रोषणगांवकर

Comments